युगांत लिहिताना आजीच्या आयुष्यच सखोल वर्णन करताना नुसतं तिच्याच बद्दल लिहिल तर ते रास्त ठरणार नाही..आजूबाजूची परिस्थिती किति कीती वेळा बदलली आणि तरीही आजीने कसा वाहणाऱ्या पाण्याने दगडाच्या आजूबाजूने प्रवाह चालू ठेवावा तसा प्रवास चालू ठेवला म्हणून..
गिरगाव सुटलं...कायमचं!!
जिथे आमच्या आजी-आजोबांनी मुंबईतील आयुष्याची सुरुवात केली..जिथे माझं गाव मुंबई म्हणून गणलं गेलं..जिथे आमच्या तिर्थरूपंचा जन्म झाला..जिथे माझा जन्म झाला..जिथे आमच्या परमपूज्य आजोबांचा युगांत झाला..जिथे कुटूंबाला भूकंपाचे धक्के बसावे तसे धक्के बसले ते गिरगाव!!!! गिरगाव सोडताना पप्पांनी शपथ घेतली आता इथे पुन्हा येणार नाही. असे का? काही गोष्टी गुलदस्त्यातच चांगल्या !!
१९९२ च्या दंगली ही आठवतात..ऑगस्ट १९९५ ला आमची बिल्डिंग पडली ते ही. त्याच्या जेमतेम १०-१२ दिवस आधी म्हणजेच १४ ऑगस्ट १९९५ ला आजोबा गेले. मी ७ वर्षांचा होतो. आजोबा गेले तेव्हा आमचे तीर्थरूप अजिबात रडले नाही!! घरातली सर्वात हळवी व्यक्ती रडली नाही!! ती पुढची अनेक वर्षे कण्हत होती!
आमची गांधीभुवन पडली ती रात्र...नाही नाही...मध्यरात्र मला अगदी स्पष्ट आठवते.. ऑगस्ट १९९५....ती भीती..तो गडद अंधार..
आमचे भाईकाका (सुहास- तिर्थरूपांचे थोरले बंधू) मला रात्रभर घेऊन बसलेले. आज अख्खी गांधीभुवन जागी होती ...मध्यरात्री. अग्निशमन दलाचे अधिकारी घराघरात जाऊन स्वयंपाकघराच्या खिडकीतून बाहेर पाहत होते. कुठे भिंतीला भेगा दिसतायत का ते पाहायला!!आणि तोच सकाळी ७ च्या सुमारास बिल्डिंग चा एक कोपरा गडगडण्याचा आवाज आला...आमची पळापळ..भाईकाकानी आम्हाला उचलून घेतले होते..एक हातात भाईकाकांची नेहमीची मनगटावर अडकवलेली सफेद पिशवी आणि सोबत आम्ही सोबत आम्ही..ते तसेच धावत खाली आले!! वाचलो!!! थोडक्यात!!!
या सर्व गदारोळात १०-१२ दिवसांपूर्वी आजोबा गेले असताना आमची आज्जी शांत होती!!! बुद्धासारखी!! काय वाटले असेल त्या मातेला?? ज्यांच्या सोबत जवळ जवळ अर्ध शतक संसार केला ते आजोबा गेले अन त्याच्या १०-१२ दिवसांतच त्यांच्या आठवणींची साक्षीदार बिल्डिंग पडावी.
त्या अर्धवट पडलेल्या बिल्डिंग मध्ये सुद्धा आम्ही अजून ४ वर्षे राहिलो. घरात दर एक दोन फुटाला लाकडाचे टेकू लावलेले..तिथेच गणपती, तिथेच दसरा आणि तिथेच दिवाळी!!
नंतर १९९९ साली समोरचे संडास पडले..आणि मग सुरुवात झाली गांधीभुवन सोडायची. हळू हळू घरं खाली होऊ लागली. पप्पांनी खूप धावपळ केली तेव्हा. आणि खूप शोधाशोध करून आम्ही बोरिवली ला रहावयास जायचे ठरवले. गांधीभुवन मधील शेवटचा दिवस तसा नीट आठवत नाही..पण एक गोष्ट मला स्पष्ट लक्षात आहे ती म्हणजे..बस मध्ये बसून निघताना आमची शलाका ताई आजिजवळ येऊन खूप रडली. आमचे ५० वर्षाचे शेजारी..कुटुंबाचा अविभाज्य भाग..मांजरेकर कुटुंबीय!! जवळजवळ २० वर्षांपूर्वी घडलेला हा प्रसंग मला इतके वर्ष लक्षात कसा काय? कदाचित तो आजच्या लेखात नमूद व्हायचा म्हणूनच!! आजीची जादूचा वेगळी.जिथे जाईल तिथे लोकं आपसूकच तिच्या जवळ येत. आजीचा लळा हा कोणालाही आपोआपच लागे...
गिरगाव सुटलं आणि आम्ही बोरिवली ला येऊन स्थायिक झालो. ६ जून १९९९ रोजी. तारखा विसरता आल्या असत्या तरी किती बरे झाले असते? तारखांच्या जंजाळात अडकलेले संदर्भ सुद्धा मिटवता आले असते तर किती बरे झाले असते? असो...
एके काळी बोरीवली पश्चिमेतील २ अख्ख्या बिंडिंग ची मालकीण आजी..आज आयुष्याच्या उत्तरायणात त्याच बोरिवली पूर्वेला १८० स्क्वेअर फुटाच्या खोलीत राहायला आली..आता मन मोकळं करायला हक्काचा नवरा सुद्धा नव्हता!! तरीही शांत..बुद्धासारखी. आजीने तिचं पूर्ण उत्तरायण मला संस्कार करण्यात घालवले. त्यातले मी स्वतः अंगिकारले तो खरं तर वादाचा मुद्दा आहे!! बोरिवलीच्या नव्या सुरुवातीला थोडा त्रास झाला..पण इथे लोकं मात्र चांगली भेटली. गिरगाव ला चांगली भेटली असे नाही..गिरगाव मधील आप्तेष्ट अजूनही कुटुंबाचा भाग आहेत..आजन्म राहतील.
बोरीवलीतील आयुष्यात आजीने दोन गोष्टी केल्या..काकांची शुश्रूषा अन माझे लाड. बोरीवलीतील आयुष्य नीट जाऊ लागले..शांततेत खरेतर..आयुष्य मुंबई ला काढलेली आजी बोरिवलीच्या जुन्या आठवणी मागे टाकून पून्हा बोरीवलीत समरस झाली.. वाईट भूतकाळ समोर आला की आपण बेचैन होतो..होतो ना?? आजी विना तक्रार बोरीवलीत स्थिरावली..
माझ्या "युगांत" भागातील सर्व उल्लेखांची सुरुवात इथेच झाली..
गिरगाव ला न जाण्याच्या पप्पांच्या निर्णयाला आमचा आपसूकच होकार होता कारण ती वेळ येई पर्यंत आम्ही बोरीवलीकर झालेलो..तिथली जागा विकली अन गिरगाव कायमचं तोडलं. बोरीवलीतल्या नवीन घरातच आजीने मला तिच्या इतिहासाचा पेटीतील एक एक दागिना दाखवायला सुरुवात केली..माझ्या आयुष्यातील तो सुवर्ण काळ होता.आजी, मी आणि भाईकाका बाहेर च्या खोलीत झोपायचो. भाईकाकांची सर्व शुश्रूषा झाली की आजी माझ्यासोबत गप्पा करायची रात्री १-२ वाजेपर्यंत. आजीची मोडी लिपीतील वही, आजीचा चष्मा अगदी आजीचा मशेरीचा डब्बा सुद्धा..मी त्या सर्वांवर प्रेम केलं.
वर्षे सरत होती..छान जात होती..बोरीवलीत सुद्धा आजीने अनेक लोकं जोडली.आजीच्या प्रेमानेच आजीला भेटायला अनेक लोक यायची..ज्यांना आजीचं सहवास कधी मिळाला नाही त्यांना ती आपली आजी वाटायची..ज्ञानासाठी भुकेल्याना कदाचित ती सरस्वती वाटायची..आईचा सहवास नसलेल्यानं आई..इथे आजीची आपोआपच स्वतःची प्रतिमा तयार झाली जिच्या प्रभावाने अनेक लोक तिला भेटायला , बोलायला यायचे.
युगांत च्या आजच्या भागात एवढेच. पुढचा भाग शेवटचा!!
युगांत- भाग ३!! समाप्त.
त्या जगन्मातेस सलाम.🙏🙏🙏
No comments:
Post a Comment