Thursday, December 29, 2016

स्वराज्य!!!

स्वराज्य!!!
ऐतिहासिक बदलाची कुठलीही शक्यता दिसत नसताना बदल घडवून इतिहास निर्माण करण्याच्या इर्षेने ज्यांनी बलिदान केले ते अमर झाले. ..४०० वर्ष साधारण झाली असतील.त्यांनी इतक्या पुरातन काळात अख्ख राज्य वसवायचं जे स्वप्न पाहिलं त्याला कदाचित दैवी शक्तीच लागत असेल.
आजच्या टेक्नॉलॉजि च्या जगात आम्ही सर्व गोष्टी इतक्या पटापट करायला लागलोय..कि काल घडलेलं आज विसरून पुन्हा पूर्ववत जगायला मोकळे..पण काही गोष्टी विसरणं परवडणारं नसतं.
विटेवर विट बांधून अख्ख स्वराज्य उभं करायचं...त्याला किती कमालीचा संयम लागत असेल?? आपला एकुलता एक राहिलेला मुलगा, "उसनं फेडून या" असं म्हणत त्याच जल्लादाकडे पाठवायचा ज्याने आपल्या थोरल्या मुलाला दगाफटका करून मारला तेंव्हा त्या मातेला हृदय किती कठोर करावे लागले असेल??
किरकोळ लढाईत आपला भाऊ अन दिर एकाच वेळी गमवावा लागला त्या बहिणीला गृहिणीला काय वाटलं असेल? इतकं हृदय मजबूत केलं कसं तिने..
एक स्वप्न पाहायचं त्या प्रमाणे आपल्या मुलाला घडवायचं, सर्व संकटांपासून दूर ठेऊन त्याला मोठं करायचं अन मग स्वराज्याच्या स्थापनेच्या अग्निकुंडात अर्पण करायचं..देवानेच पाठवले असेल त्या वीर मातेला जिने जन्मभर फक्त त्याग केला..तिच्या त्याग इतका होता की त्यातून जे काही मिळालं ते पुढची ४०० वर्ष उपयोगी पडतंय..स्वराज्य.
होय स्वराज्य..कारण ते शून्यातून निर्माण झाले..आपल्या सह्याद्री च्या मावळ प्रांताच्या दऱ्या खोऱ्यातून मुलांना जमवायचं..त्यांना स्वत्व, स्वाभिमान , आपली ओळख निर्माण करण्याचा निर्धार निर्माण करणं तो तेवत ठेवणं..हे तेव्हा जेव्हा ना वाचायला साहित्य होते ना ओळख निर्माण करायला शिक्षण..अश्या काळात गरीब शोषित जनतेला उभं करून स्वराज्याचं शिलेदार बनवणं त्याला किती मेहनत लागली असेल?टिम-वर्क जे आपण म्हणतो ते हेच कि!!!
पोटात २ वेळचं जेवण जायची जेव्हा शाश्वती नव्हती तेव्हा हे केलं..इतकंच नव्हे तर त्या शूरवीरांनी बलिदानाच्या परिसीमा गाठल्या. काळ कुठला हि असो..जो मातीशी इमान राखतो, जो आपल्या लोकांशी इमान राखतो, त्यांचा विचार आधी करतो..त्याला आयुष्यात समाधान नक्कीच मिळेल..

पंकज कानडे

Sunday, December 25, 2016

शिवस्मारक अन राममंदिर..इतिहासाची क्रूर थट्टा

एक भारतीय सेक्यूलर अ-राष्ट्रवादी म्हणून ३५०० कोटींच्या खर्चाला विरोध करू कि बाकी धर्मांना सुद्धा करोडोंची सबसिडी मिळते हे सत्य लक्षात ठेवून माझ्या देवाच्या स्मारकाला सुद्धा पैसे खर्च झाले तर बिघडलं कुठे हि बाजू घेऊ??
हा शिवस्मारक किंवा किल्यांची डागडुजी अन नूतनीकारण ह्या मध्ये शिवरायांचा सच्चा मावळा किल्यांनाच निर्विवादपने पसंती देईल.
शिवस्मरकामुळे पर्यटनाला चालना मिळेल रोजगार वाढेल इतक्या हास्यास्पद भूलथापांना सुजाण नागरिक बळी पडला तरच नवल. अन इतिहासाच्या खुणा जपून काळजी घेऊन त्यांना प्रसिद्ध करावे हीच इच्छा होती.अन त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व किल्यांची डागडुजी करणं अपेक्षित होतं.
शिवस्मारक इतिहास जरूर सांगेल पण रायगडावर खलबत खान्यात जाऊन जो रोमांच भरला जातो जो काटा अंगावर उभा राहतो तो असे किती हि करोडो स्मारकं उभी केली तरी शक्य नाही..कारण माझ्या शिवबाच्या किल्यांना इतिहास आहे.
बाबासाहेब पुरंदरेंनी पन्हाळा ते पावनखिंड च्या जगावेगळ्या धडसाबद्दल लिहिलेल्या ओळी इथे अगदी योग्य बसतात..इथली माती पाण्यात मिसळा, पाण्याला रंग चढेल रक्ताचा.
शेकडो मावळ्यांच्या बलिदानाने अन त्या बद्दलच्या अभिमानाने जी माझ्या सह्याद्रीची छाती ५६ इंचाची होते अन त्या ठिकाणी गेल्यावर आपसूकच मान झुकून आम्ही शिवरायांचे मावळे अभिमानाने त्रिवार मुजरा करतो..ती सर शिवस्मारकाला येणार नाही.
महाराष्ट्र अजून हि दुष्काळाच्या पारतंत्र्यात असताना स्मारकावर ३५०० कोटी खर्च केले हे पाहून त्या शिवस्मारकातील शिवरायांना गुदमरायला होणार नाही का??
आपल्या इथे मुख्य प्रॉब्लेम असा आहे..आपण शिवरायांच्या मूल्यांवर , नितींवर , नियोजन अन आर्थिक कौशल्यांवर काहीही भाष्य न करता त्यांच्या जन्माच्या अन पुण्यतिथीच्या तारखांवर भांडत बसतो..शिवरायांनी कधीही अपेक्षा नसेल कि त्यांच्या जन्मतिथी वरून भांडणं होतील..अरे त्यांची मूल्य जपली असती, त्यांची नियोजन कौशल्य अंगिकारली असती तर हर दिन शिवजयंती साजरी झाली असती. पण साधेपणा धरून मूल्य जपली तर शो-बाजी कोण करणार?
अन हे राममंदिराला सुद्धा लागू होते..सबका साथ सबका विकासाच्या नाऱ्याला लोकांनी होकार दिला आणि भाजपाला पुढची ५ वर्ष देशाची धुरा दिली. अयोध्येत खरं खुरं राम मंदिर झालं असतं तर सर्वांनाच आवडलं असतं पण विकासाच्या नावाखाली अनेक वर्षांनी एकत्र येऊ पाहणाऱ्या समाजाच्या एकात्मतेला राममंदिर रेल्वे स्थानक हे पडलेलं सर्वात मोठं भगदाड आहे.
खरं खुरं राम मंदिर बांधायचं सोडून ह्या लोकांनी मुंबईतल्या एका रेल्वे स्थानकाला राममंदिराचं नाव दिलं.आता उद्या तिथे पानाच्या पिचकाऱ्या पडतील तेव्हा ह्यांचं राम मंदिराचं स्वप्न पूर्ण होईल. अरे जनतेच्या तोंडाला पानंच पुसायची आहेत तर आपट्याची तरी पुसा???
सच्चा शिवभक्त!!
पंकज कानडे.
#शिवस्मारक #Shivsmarak #ShivajiStatue #RamMandir #राममंदिर

Thursday, December 22, 2016

संभ्रम, चक्रव्यूह अन आशेचा हिरमुसलेला चेहरा!!


८ नोव्हेंबर रोजी जेव्हा पंतप्रधानांनी अभूतपूर्व ऐतिहासिक निर्णय दिला तेव्हा खरं तर भारतीय असल्याचा अभिमान वाटला. भारत हा जगातील सर्वात बेस्ट देश आहे असेच वाटले. मोदीजींनी ज्या गोपनियतेने भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा निर्णय जाहीर केला तेव्हा वाटलं..बंदे में दम है.ये कुछ कर दिखायेगा.
त्या निर्णयाचा छापील परिणामच इतका होता की,तास दोन तास किंव्हा ४-४ तास रांगेत उन्हा तानात उभे रहावे लागले तरी बेहद्दर पण आज आम्ही सर्व जाती, भाषा, राज्य, पक्षाची बंधने झुगारून मोदींच्या आणि मुख्यत्वे त्यांच्या ह्या लढ्यात पर्यायाने निर्णयात सामील आहोत.अशी मनोमन संमतीच देऊन टाकली.
दिवस सरत गेले आणि एक महिना कसा झाला हे कळलेच नाही. एका महिन्यात बऱ्याच गोष्टी घडत गेल्या. सर्व प्रथम विरोधी बाका वर बसलेल्या मुलाचा चेहरा असा झाला होता की शाळेतला पेपर फुटला मग आम्हाला का नाही दिला?? हि परीक्षाच मुळात अनधिकृत आहे वगैरे..कोल्ह्याला द्राक्ष आंबट.त्यात दुर्दैवाने सेनेनं हि सरकार मध्ये असून ही दीदी ना समर्थनार्थ पाऊल उचलले अन मन थोडे खट्टू झाले. शेवटी, अडीच वर्षे भारत देश बादलेगा ह्या वाक्याला अपेक्षित असा चमत्कार झाला नव्हता तो आता होताना दिसला. माझ्या ह्या आधीच्या लेखातील उल्लेख पुन्हा नमूद करावासा वाटतो.ज्यांच्या घरी ५००-१००० च्या बंडला आहेत तेच जास्त खवळले. पण हा खरं तर बारकाईने पहिले तर खूपच वर करणी विचार होता.राजकीय पक्षांच्या बोलण्याला आजकाल काहीच महत्व रहिले नाही..सुदैवाने.
विचार केल्यास कळले जखमे पेक्ष औषध जास्त गंभीर निघाले.महिना झाला बँकांच्या रांगा कमी झाल्याच नाहीत. उन्हातान्हात मोदींच्या एका भाषणात उभ्या असलेल्या जनतेला घरी येऊन जेव्हा टीव्ही वर कुठे किती २००० च्या नोटांची बंडल मिळाली हे पाहावे लागले तेव्हा खरं तर नोटबंदी चा फुगा फुटला.अन ज्या राजकीय पक्षांच्या विरुद्ध हे पाऊल असणे अपेक्षित होते त्यांना कुठलाच व्याज आकारण्यात येणार नाही हे महिन्या शेवटी जेव्हा समजते तेव्हा मनाला एक विचार चटकन शिवून गेला..मोदी असो वा गांधी..इस हमाम में सब नंगे है.
शहरातील लोकांना तरी काही मर्यादेपर्यंत कॅशलेस व्यवहार शक्य आहे.मी स्वतः माझ्या घरच्या कारपेंटर ला चेक ने जेव्हा पैसे दिले तेव्हा तात्पुरतं बरं वाटलं.देशासाठी काहितरी करतोय असं वाटलं.पण जिथे बँकांमध्ये पैसेच नाही तिथे कॅशलेस व्यवहार करून मी रांगेत उभे राहण्याचे माझे कष्ट माझ्या कारपेंटर ला सोपवले हेच सत्य.गावातील परिस्थितीवर आपण भाष्य करणार तरी काय?जिथे पाण्यासाठी १०किलोमीटर चालावे लागते..दिवसाची १२ तास वीज जाते..तिथे कॅशलेस च्या गप्पा म्हणजे मंगळावर वस्ती करण्या इतपत खोट्या आहेत.ह्या भूलथापा वाटतात.
कॅशलेस व्यवहार, आर्थिक व्यवस्थेची सुधारणा,आणि देशाचे आर्थिक स्थैर्याचे स्वप्न दाखवणारे मोदीजी ३५००कोटी खर्चून उभारणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा नारळ वाढवणार आहेत.छत्रपतींनी त्यांची आकाशाकडे झेपवणारी तलवार ह्यांच्या मानांवर चालवली असती.
सामान्य माणसाची अवस्था तर आता चक्रव्यूह मध्ये अडकल्यागत झालीये. संभ्रमावस्था संपत तोपर्यंत नाही जोपर्यंत गोष्टी पूर्व पदावर येत नाहीत.आशेचा एकच किरण दिसत होता..मोदींचा ८ नोव्हेंबर चा निर्णय म्हणजे विझण्यापूर्वी फडफडणारी दिव्याची ज्योत नसली म्हणजे मिळवलं.
अखंड भारत!!!
पंकज कानडे..

Wednesday, November 23, 2016

ध्रुवतारा!!!!

आकाशात एकच तारा असावा,
सर्वात निरागस सर्वात सुंदर
अन तो सुद्धा तुटावा..
भकास होते आकाश
बघवत नाही त्याला..
तारा कायमचा तुटलाय..
कधीच न परतण्याला...

वाटते सारखे पाहू..
दिसेल कधीतरी मधेच..
कसा न सांगता गेला तो..
सापडत नाही कुठेच..

गेला आता तो तारा..
कायमचा सोडून आपल्याला..
कितीदा समजावू तेच तेच..
तरी न पटे माझ्या मनाला

त्या ताऱ्याचे तेजच तसे..
प्रेमळ खूप सोज्वळ खूप..
हवा हवासा वाटणारा सहवास त्याचा..
साहजिकच त्याची प्रसिद्धी खूप..

प्रेमळ स्वभावाने आपल्या..
अनेक मनं जोडली त्याने..
काहींच्या हृदयातलं पान बनला
काहींसाठी सोनेरी क्षण बनला

काय अभद्र सुचले देवा तुला..
न सांगता घेऊन गेलास..
आमच्या हक्काच्या ताऱ्याला तू..
आम्हा पासूनच दूर केलास..

किती देवा क्रूर तुझी थट्टा..
मन जोडणारा, सर्वांना हसवणारा..
गेलास घेऊन तू..
पाठी ठेवलेस आता रडके चेहरे
जोडलेल्या मनाला तोडून तू..
हो हो तूच....

स्वप्न पाहतोय मी आता..
त्याच ताऱ्याच्या सर्व गुणांचे..
एक गाव असेल..एक गाव बसेल..
मला होणाऱ्या पहिल्या पुत्राचे..
योगीन हेच नाव असेल..
योगीन हेच नाव असेल...
योगीन हेच नाव असेल...
पंकज कानडे...

Tuesday, November 22, 2016

झी मराठी चे डोके ठिकाणावर आहे काय?????

रात्रौ ८:०० वाजता: लग्नाबाहेरील संबंध.
रात्रौ ८:३० वाजता: लग्नाआधीचे संबंध.
रात्रौ ९:०० वाजता: लग्नानंतरचे (बिघडलेले) संबंध.
रात्रौ १०:३० वाजता: लग्नानंतरचे (संपवलेले) संबंध.

झी मराठी चे डोके ठिकाणावर आहे काय?????

दररोज मराठी जनांच्या करमणुकीचे साधन बनलेली आणि अनेकांच्या गळ्यातील ताईत बनलेली झी मराठी वाहिनीचं लोकसत्ता झालंय.(सुजाण नागरिकाला कळेल लोकसत्ता होणं म्हणजे काय ते)
होणार सून मी..दिल दोस्ती दुनियादारी..जुळून येती रेशीमगाठी..ह्या हल्लीच्या झाल्या..
मधल्या काळातील.. एका लग्नाची दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट..त्याआधीच इतिहासात नोंद व्हावी अशी टिपरे..अजरामर झालेली अभाळमाया, वादळवाट.. नावं घ्यावी तितकी कमी..
पिंपळपान ने तर कायमचे घर केले हृदयात.
लिहायचा मुद्दा असा कि आजकाल जे झी मराठी वर जे चाललंय ते पाहून मराठी प्रेक्षक खरंच हे डिसर्व करतात का?
हाच प्रश्न पडतो.
सुजाण स्वाभिमानी मराठी प्रेक्षक जेव्हा मराठी पुरस्कार वितरण सोहळ्यात जेव्हा हिंदी गाण्यांवर ताल धरणारे मराठी तार-तारका पाहून तर डोक्याचा पारा चढतोच.आम्ही मराठी प्रेक्षक मराठी चित्रपट सृष्टी साठी खूप जास्त जागरूक असतो.अश्यावेळी जेव्हा झी मराठी सारखी वाहिनी जिच्याकडे मराठी चित्रपटसृष्टीची धुरा आहे ती जेव्हा स्वाभिमान बाजूला ठेऊन पुरस्कार वितरण सोहळ्यात हिंदी गाणी चालवतात तेव्हा वाईट वाटतं. झी मराठी ने आजपर्यंत खूप दर्जेदार कार्यक्रम दिलेत त्यामुळे त्यांना एक संधी देऊ आपण प्रेक्षक म्हणून.
झी मराठी वर संध्याकाळी ८ वाजल्यापासून जो संसारिक विध्वंस चालवला जातो तो पाहून अक्षरशः वीट आलाय.
झी मराठीच्या सध्याच्या मालिकांबद्दल न लिहिलेलेच बरे.
तरी संक्षिप्त स्वरूपात लिहायचं झालं तर...
रात्रौ ८:०० वाजता: लग्नाबाहेरील संबंध.
रात्रौ ८:३० वाजता: लग्नाआधीचे संबंध.
रात्रौ ९:०० वाजता: लग्नानंतरचे (बिघडलेले) संबंध.
रात्रौ १०:३० वाजता: लग्नानंतरचे (संपवलेले) संबंध.
आता वळूया चला हवा येउ द्या कडे..
उत्तम शो..मराठी चित्रपट,नाटकं, मराठी कलाकार यांना हक्काचं व्यासपीठ.अश्या व्यासपीठावर हिंदीसाठी पायघड्या घालून हिंदी सिनेतारकांचं लांगून चालन करणं कितपत योग्य???
मराठी कार्यक्रमांचं प्रमोशन करताना दर्जेदार कलाकृती सादर करणाऱ्या चला हवा येऊ द्या चं "स्टॅण्डर्ड" हिंदी तारका आल्यावर इतकं घसरतं कि वैतागून चॅनेल बद्दलण्यावाचून पर्याय नसतो.त्यात कलाकारांची हिंदी तारकांना खुश करण्यासाठी चालू असलेली धडपड, मराठी तारकांच्या उपस्थितीत चालणारी शाब्दिक कोटी हिंदी तारका आल्यावर शारीरिक विनोदांमध्ये बदलते.स्वाभिमान???
मराठी अवॉर्ड शो मधली हिंदी गाणी असो वा चला हवा येऊ द्या मधलं हिंदीवाल्यांसाठीचं पायघड्या घालणं असो..ह्यावरून एकच लक्षात येतं आपण अजूनही आपला धडा शिकलेलो नाही.एकीकडे दर्जेदार मराठी सिनेमे काढणाऱ्या झी मराठीने चॅनेल आणि अवॉर्ड शो बाबतीत इतका ढसाळ कारभार कसा करावा?
दक्षिणेत "के बी सी" चे एपिसोड सुद्धा भाषांतर करून दाखवले जातात.स्वाभिमान टिकवण्याचा भाग आहे फक्त.हिंदी वाईट नाही पण त्यापाठी धावण्यात आपलेपण हरवू नये असं आम्हा स्वाभिमानी मराठ्यांना(म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला हो) वाटतं.
स्वाभिमान काय चीज आहे हे सांगण्यात साहेबांची पुण्याई खर्च झाली. साहेब खरं तर नेहमीच मराठी चित्रपट सृष्टी ला जवळ करत..
असो.
जय महाराष्ट्र!!!
पंकज कानडे

Monday, November 21, 2016

टिळक महाराज, काय देऊन गेलात तुम्ही आम्हाला हे???



स.न. वि.वि
टिळक महाराज,
     माफ करा कारण तुमच्या सारख्या देवाला, देवळातील देव मंडपात आणणाऱ्याला मी यस्कश्चित पामर पत्र लिहितोय.पण आजूबाजूच्यांना सांगून हि समजत नाहीये...किंबहुना त्यांना हे हि माहित नाहीये कि त्यांना माहित नाहीये. त्यामुळे व्यथा तुमच्या दरबारात मांडतोय.तुम्ही रोख ठोक बोलणारे...ओठातून शब्द बंदुकीच्या गोळी सारखा कुठे हि विचलित न होता वेध घेणारे..महापुरुष.त्यामुळे काहीही आढे वेढे न घेता सरळ विषयलाच हात घालतो. विषयाला जाण्या पूर्वी एक आवर्जून सांगतो..आम्हा आजच्या पिढी ला ज्यांना इतिहासासारख्या रटाळ विषयात तासंतास भटकण्याची कीड लागलेली आहे त्यांना टिळकांचा चेहरा माहित नव्हता पण तो आम्हाला दिला श्री.सुबोध भावे यांनी..त्याकरिता त्यांचे मनःपूर्वक आभार.
आता मूळ विषयाकडे वळूयात.
      खुद्द इंग्रज तुम्हाला अनेक पिढ्या लक्षात ठेवतील असे आपले किस्से..तुमच्या एका तीक्ष्ण नजरेवर बंदूकधारी पोलीस सुद्धा ओली करेल..इतकी करडी नजर..बाळ गंगाधर टिळकांचे टिळक महाराज झाले..तुमचे कर्तृत्व वाचून अंगावर शहारे येतात..पण तरीही तुम्ही दोन गोष्टी दिल्यात ज्यात महाराष्ट्राच्या अनेक पिढ्या भरकटक्या गेल्या.गेल्या अनेक वर्षांत अनेक अब्जावधी रुपये वाया गेले तुम्ही दिलेल्या दोन गोष्टींनी..एक म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव आणि दुसरं म्हणजे  शिवजयंती.
          अहो काय दिलंत तुम्ही हे महाराष्ट्राला?? तुम्ही देवाऱ्यातला देव इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी एकजूट व्हावी म्हणून मंडपात आणलात.आमच्या लोकांनी मंडपातला गणपती रस्त्यावर आणला.त्याला पोरका केला.. त्याचा छळ मांडलाय आपल्याच लोकांनी.आमच्या गणपतीच्या मिरवणुकीत.."चिकनी चमेली" सुद्धा नाचवली जाते..कोट्यवधींची वर्गणी गोळा होते..ती जाते कुठे ते माहित नाही पण दर वर्षी हजारो किलोचे प्लास्टर ऑफ पॅरिस मात्र नं चुकता समुद्रात जाते.समुद्रात एकदा गेले की मग कुठला लालबाग किंवा गिरगाव चा राजा?? मग कुठला नवसाला पावणारा गडगंज श्रीमंत जी.एस.बी.चा राजा??सर्वांचे तुकडे होऊन परत समुद्रा काठी येतात..ते सावरायला मग रात्रंदिवस काम करणारे मंडळातले कार्यकर्ते कुठे गायब होतात हे मात्र कळत नाही.गणपतीची वर्गणी सुद्धा खंडणी मागावी तशी मागतात.गणपती भेटले नाही का हो तुम्हाला ह्या आधीच हि व्यथा घेऊन? का हि शिक्षा? सच्च्या भक्तांना आणि त्याच्या भक्ती ला?मिरवणुकीत नाचायला साठ जण अन गणपतीच्या आरती ला आठ जण..ती सुद्धा स्पष्ट येत नाही..म्हणणाऱ्यासोबत सगळेच म्हणतात..आरतीचं पुस्तक समोर ठेऊन जरी ह्यांची परीक्षा घेतली तर हे मंडळाचे कार्यकर्ते नापास होतील.
           शिवजयंतीचि सुद्धा परिस्थिती काही फारशी वेगळी नाही.लोककल्याणासाठी आपण शिवजयंती उत्सव सुरु केलात खरा.पण आमच्या लोकांनी शिवाजी महाराजांना कोर्टातच नेऊन उभा केला.शिवाजी महाराजांचा हि चेहरा आम्हाला माहित नव्हता पण तो आम्हाला एका शिवभक्ताने मनोभावे शिवरायांची पूजा करून दिला..त्या महान नटाचे हि मनःपूर्वक आभार.श्री.अमोल कोल्हे.तुम्ही शिवजयंती सुरु करून एक शतक लोटले असेल पण आमच्या लोकांना अजून छत्रपतींच्या जन्मतारखेवरूनच शंका आहे. आमच्या शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत पण शिवस्मरकासाठी द्यायला मात्र ५००कोटी आहेत..तुम्ही आज असता तर तितक्याच लाथा घातल्या असत्या ह्यांच्या बुडावर..महाराजांची नियोजन कौशल्य,त्यांची दूरदृष्टी,त्यांचं प्रत्येक कामाचं प्लॅंनिंग ह्यात आम्हाला काडी मात्र रस नाहीये.त्याहूनही आम्ही हळू हळू पाठ्य पुस्तकातून एक एक धडा गाळतोत..फक्त १ मे आणि तिथीनुसार आणि तारखे नुसार पडणाऱ्या शिवजयंतीला कानठळ्या बसणारी गाणी लावून एक दिवस शिवाजी महाराजांना आम्ही लक्षात ठेवतो.
भेटले नाही का हो तुम्हाला शिवाजी महाराज त्यांची व्यथा घेऊन??
            आम्ही तर इतके मोठे नाही, आम्ही सामान्य माणसं. पण बरं काय वाईट काय हे तर प्रत्येकाला कळतं ना?आम्ही तुम्हाला जाब विचारावा इतके मोठे नाही.पण तुम्ही लोककल्याणासाठी दिलेल्या दोन गोष्टींच्या बाबतीत नाकापेक्षा मोती इतका जड झालाय कि व्यथित होऊन आमच्या वतीने गणेशजी आणि शिवाजी महाराज सुद्धा विचारतील..टिळक महाराज, काय देऊन गेलात तुम्ही आम्हाला हे???

आपला एक भक्त,
पंकज कानडे

मराठा तितुका मेळवावा...

आपण किती सहज दुभागले जातो.एखाद्या घटनेचं स्वरूप जे प्रथम दर्शनी एका घाणेरड्या मनोवृत्ती च्या स्वरूपात असतं त्याला पोलिटिकल रंगरंगोटी केली की हवा तसा अर्थ काढण्यात येतो.मराठा समाजाचा मोर्चा पाहून तर खरंच भीती वाटायला लागलीये.आणि सोशल मीडिया ह्या आगीला तेलाचं काम करतेय.आज दलित आणि मराठा समाज एकमेकांसमोर उभे आहेत.पण झालेल्या घटनेला जातीचा रंग देऊन कुजलेल्या मानसिकतेतून जे अपराध जन्म घेतात त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते.आजचं तेच सत्य अधोरेखित करू पाहणारा माझा आजचा लेख.
आधीच मराठी जनतेला दुहीचा शाप आहे.मराठी जनतेला एकमेकांशी लढायला जातीपातीच्या,पैस्याच्या, परंपरा चालीरीतींच्या कुबड्या सुद्धा लागत नाहीत.आपण एकमेकांवर जळण्यात, मराठीचा गळा दाबण्यातच मौज मानतो.त्यात मराठा समाजाचा मोर्चा म्हणजे महाराष्ट्राच्या उरल्यासुरल्या एकी ला सुरुंग लावण्यासारखेच आहे.
 (Politically motivated stunt by Pawar & Co. to fool maratha community into caste based politics.
If rumours are to be believed then the plan is to create pressure so as to throw Maha. CM out of power.)
कोपार्डी प्रकरणात अन्याय झाला १००% कबूल. पण आपल्याला प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक नावात जात शोधायची जी घाणेरडी सवय लागलीये त्याचे गंभीर परिणाम होतायत.एकीकडे आरक्षण रद्द करा अशी बोंब ठोकली जाते अन दुसरी कडे जातीच्या भेगा रुंदावण्याचं काम केलं जात.
शिवाजी महाराज जन्मभर लढले.मराठा म्हणजेच संपूर्ण मराठी समाज हे समजावत.मराठ्यांचं राज्य म्हणजेच महाराष्ट्रातील मराठी भाषिक,स्वाभिमानी मराठी जनतेचं राज्य.
मी राजसमर्थक नाही पण आज राज ठाकरेंचं भाषण खूप प्रकर्षाने जाणवतंय.त्यांच्या 3 मे २००८ च्या भाषणातील कोण मराठी?? ची व्याख्या खूप स्पष्ट पणे आठवते.. शिवाजी महाराज कि....म्हटल्यावर ज्याच्या तोंडून आपसूक 'जय' येतं तो मराठी..शिवरायांचं शिवचरित्र वाचताना ज्याच्या अंगावर काटा येतो ना तो मराठी..ज्ञानेश्वर माऊलीं पासून कुसुमाग्रजांच्या कविता वाचताना तल्लीन होतो तो मराठी
मराठा जातीच्या जनतेचा मूक मोर्चा स्तुत्य,कोणत्या हि विपरीत घटनेशिवाय लाखोंचा मोर्चा काढणे स्तुत्यचं आहे पण मराठा म्हणजेच संपूर्ण मराठी समाज..मराठयांचं राज्य म्हणजेच मराठी जनतेचं राज्य. उगाच राजकारणी लोकांच्या भूलथापांना बळी पडून आपण एकमेकांपासून कायमचे दूर जाऊ.आपल्याला एकत्र लढायचंय आपल्या पुण्या मुंबईत आपला मराठी टक्का टिकवायचाय आणि वाढवायचाय. जातीपातीच्या बंधनं झुगारून एक मराठी म्हणून एकत्र राहायचं.
गुन्हे घडतच राहतील कारण त्या मागे जात नसून कूजलेली अन बुरसटलेली बुद्धी असते.तिचा बिमोड करायचा असेल तर वेगळी वाट पकडून नाही एक मराठी बनून एकत्र येऊन लढावं लागेल.
जात और खून से नहीं दिल से मराठा होना है।
महाराजांची मराठा ह्या शब्दाची संकल्पना खूप भव्य होती.ती स्वामी समर्थ रामदासांकडून आलेली.साधारण ४००वर्षांपूर्वी श्री स्वामी समर्थ रामदासांनी जी मराठी ची मराठा ची व्याख्या सांगितली ती आपण इतक्या सहजासहजी कसे विसरलो.मराठा म्हणजेच मराठी,मराठा म्हणजेच महाराष्ट्र.आज समर्थांनी लिहिलेल्या ओळींना पून्हा स्मरण करायची वेळ आली आहे.
मराठा तितुका मेळवावा,महाराष्ट्र धर्म वाढवावा।।
जय महाराष्ट्र!!
पंकज कानडे.

एक मराठी लाख मराठी, देख मराठी सोच मराठी!!!

शिवसेनेवर मी जेव्हा टीकास्त्र सोडतो तेव्हा सेनाद्वेषी लोकं फार सुखावतात.गम्मत वाटते..असं वाटतं सेनेबद्दल वाईट लिहिलंय या भावनेने नं वाचताच लाईक ठोकत असतील. ह्यात आपले काही अती सुशिक्षित तरुण मराठी लोक हि आहेत ज्यांच्या तिर्थरूपांनाच कदाचित बाळासाहेबांच्याच आशीर्वादाने नोकरी लागली असेल.आज हि मुलं कॉन्व्हेंट मध्ये जाऊन मोठी झाली म्हणून सेना कदाचित डाउन मार्केट वाटत असेल.
असो सोडा..मुद्दा तो नाहीये. ह्या आधीचा माझा लेख "शिवसेनेचे डेमॉनेटिझेशन" हा वायरल झाला व्हाट्सअप्प वर म्हणून खरं तर लिहितोय आज.
शिवसेनेवर टीका करताना अजिबात मजा येत नाही.आपल्या जवळची असलेली सेना आज काही चुकीच्या वक्तव्यामुळे हास्यास पात्र ठरते.वाईट वाटतं म्हणून लिहिलं जातं. आंधळ्या भक्तांना समजणार नाही..पण आपल्या सेनेत चुका होत असतील तर त्या वेळीच सावरून दुरुस्त केल्या पाहिजेत.त्यानं कडे दुर्लक्ष केले तर चलणार नाही.सेनद्वेषीना मी त्यांच्यातला वाटत असेन. आमचे रक्त भगवं आहे म्हणून किती ही टीका केली तरी आमचं मत नेहमी सेनेच्या पारड्यात पडणार. प्रार्थना एवढीच आहे सेनेने मात्र आम्हाला जबरदस्ती करू नये...कश्यासाठी??? त्यांना आम्ही मत देऊ नये यासाठी.

आपली शिवसेनेची ख्याती आहे ते लोकहितासाठी काम करण्याची..आपली सेनेची ख्याती आहे "करून दाखवलं" म्हणण्याची.आपली सेनेची ख्याती आहे..जे योग्य आहे तेच करण्याची..मग ते पोलिटिकल पंडितांच्या पुस्तकात न बसणारे असायचे बऱ्याचदा.बाळासाहेबांचं वैशिष्ट्य तेच होतं.. जे मनात आहे तेच ओठांवर..

आज ते होताना दिसत नाही..ममता बॅनर्जी सोबत जाऊन सरकार मध्ये मंत्रिपद उपभोगून सरकार ला विरोध करणं म्हणजे लाचारिपेक्षा हि भयानक आहे.आपापल्या मनाला विचारा..उत्तर मिळेल...बाळासाहेबांनी नोटबंदी ला पाठिंबच दिला असता.

सेनेने साधा विचार करायला हवा होता..भाजपच्या नेत्यांचे पैसे अडकले नसतील का?? अर्थाचे असतील पण ते मूग गिळून गप बसलेत.नोट बंदी झाली आणि शिवसेना नेत्यांनी बेताल वक्तव्य सुरु केली..त्यामुळे जे चित्र "इस हमाम में सब नंगे है" असं असायला हवे होते ते आता विनाकारण सेनेकडे खूप काळा पैसा आहे असे आहे.अर्थात ते सुद्धा सत्यच. पण मस्ती अख्या वर्गाने करावी आणि मार एकाने खावा असं झालं.

दस्तुरखुद्द पवार साहेब म्हणजे करप्शन चे महागुरू सुद्धा गप बसले..सेना वाल्यानी "लोकांना गैरसोय होतेय" ह्या बहाण्याखाली जे सरकारच्या कामात अडथळे निर्माण केले त्याऐवजी सरकार सोबत राहिले असते तर त्याचा फायदा महापालिकेला झाला असता.आज साहेब नाहीत म्हणून काही उनाड टाळकी सेना चालवायला बघतायत.

कट्टर सैनिकांना एकच विनंती सेना वाढवायची असेल तर सेनेच्या असल्या फाजील गोष्टींना लाथ मारा.सेना अजूनही साहेबांची आहे..आणि साहेबांनी सेना अशी मुळीच चालवली नसती.
#एकमराठीलाखमराठी

कट्टर शिवसैनिक
पंकज कानडे..
जय महाराष्ट्र!!

Saturday, October 22, 2016

...विठ्ठलाचा झेंडा...


     महाराष्ट्र, मराठा, मराठी हि एकाच स्वाभिमानी कर्तृत्वाची, इतिहासाची, एकीची तीन नावे आहेत.हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना, शिवरायांनी फक्त जातीने मराठा असलेल्यांना स्वराज्यात सामील केले नाही.तसे केले असते तर स्वराज्य स्थापनच झाले नसते.त्यांचा मराठा ह्या शब्दाचा अर्थ सर्व समावेशक होता.मराठा म्हणजेच महाराष्ट्रात राहणारा, मराठी भाषिक हिंदू.ती व्याख्या अजून मोठी अन व्यापक झाली जेव्हा आपला महाराष्ट्रात राहणारा मुस्लिम समाज मावळ्यांच्या खांद्याला खांदा लावून स्वराज्यासाठी लढला.
      इतिहासात त्यागाची परिसीमा गाठून जात पात न बघता स्वराज्यासाठी लढणारे समाजाच्या सर्व स्तरातील, सर्व जातीचे मावळे लढले म्हणून स्वराज्य टिकले. नाहीतर आपल्या इथे आजकाल सर्व जातीचे एकमेकांना शिव्या घालतायत. स्वराज्यासाठी प्राणार्पण केलेल्या शूरवीरांना आज किती यातना होत असतील ह्याचा विचार करा.महाराष्ट्र एकसंध बांधण्यात आपली पुण्याई खर्च करणाऱ्या परमपूज्य बाळासाहेबांना आज स्वर्गलोकात किती यातना होत असतील याचा विचार करा..शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणवून आजचा मराठा क्रांतीत सामील होणारा समाज महाराष्ट्राच्या एकीला मोठी भगदाड पडणारा आहे.
     शिवसेना(बाळासाहेबांची) सर्व जातीस्तरातील मराठी समाजाला एकत्र करण्यात गेली ५० हुन अधिक वर्ष झटली. बाळासाहेबांनी दगडातून नेते निर्माण केले.आणि आज मराठा समाजातील लोकं स्वतः ला शिवसैनिक म्हणवणारे सेनेवर रुसून बसलेत.ह्यापुढे सेनेला मतदान करणार नाहीत असं काहीतरी फाजील बडबडतायत. आता जात मराठी, महाराष्ट्रापेक्षा मोठी झाली का?
     त्यांची भूमिका किती दुटप्पी आहे हे स्वतः पाहावे.सेनेच्या शाखेत प्रवेश करताना जात बाहेर ठेऊन येतो आपण.तीच बाळासाहेबांची शिकवण होती.साहेब जाऊन किती वर्षे झाली?आपण इतक्या सहज स्वार्थापायी ती मूल्य कशी विसरलोत?
      एक गोष्ट लक्षवेधी आहे..आजच्या मराठी मीडिया ने जाणूनबुजून ह्या आंदोलनाची बाजू उचलून धरलीये. सेनेविरुद्ध बोलताना लोकशाही,सर्वसमानतेचा  चा झेंडा फडकवणारे आज तो झेंडा कुठे घालून बसलेत?
एक कळकळणार मराठी.
पंकज कानडे.
#देखमराठासोचमराठा