Wednesday, October 17, 2018

युगांत!! भाग-२


युगांत!! भाग-२.
मराठी अन इंग्रजी भाषेवर आमच्या घरच्यांनी मजनू सारखं प्रेम केलंय. त्या मुळे जेव्हा इंग्रजी भाषेतील पकडी साठी लोकं जेव्हा माझी स्तुती करतात तेव्हा प्रत्येक वेळी सांगावं लागतं.. अरे बाबांनो असे काही नाही. जे काही आहे ते तीर्थरूपांचे आहे. आमच्यात ज्या २-४ गोष्टी आल्यात त्या त्यांच्या पिढीकडून. आजी बोलता बोलता सहज एखादा अभंग किंवा एखाद्या कादंबरीतील संदर्भ इतक्या सहजतेने द्यायची की तिने ते स्वतः लिहिले असेल.

१९४२ ते १९९९ या कालखंडात आम्ही गिरगाव येथे वास्तव्यास होतो. कदाचित गिरगाव चा तो सुवर्णकाळाचा शेवट होता. आता तिथे जाऊसे ही वाटत नाही. मुंबईला आल्यावर आजोबा कामासाठी प्रयत्न करू लागले. आजोबा आधी घरभाडे जमा करायचं काम करायचे. शिक्षणाने वकील असलेले आजोबा या पेक्षा ही मोठं काम करणार होतेच. आणि मला जितके माहीत आहे, आजोबा भारत सरकार मध्ये मुंबई रेशनिंग कमिशन चे डेप्युटी कलेक्टर होते. पंजाब मध्ये हरित क्रांती झाली तेव्हा मुंबई साठी गहू आणायच्या कामात आजोबांनी सुद्धा मोठा वाटा उचलला होता. त्यांच्या साठी लाल दिव्याची गाडी यायची त्यांना रोज न्यायला. या सर्व गोष्टींचा आजीने ना कधी माज केला , ना कधी स्वतःच्या मौजेसाठी हट्ट केला ना तशी इच्छा ठेवली. 

आजीने तिच्या धाकट्या धीराची , नंदेंची लग्न घरच्या थोरल्या स्त्री ने करावी तशीच केली. नंडेच बाळंतपण सुद्धा तिने केलं. याच प्रवासात आजीला ५ मुलं झाली. आमचे थोरले काका- सुहास (त्यांचा आजीच्या आयुष्यावर या पूढे किती प्रभाव पडेल अन त्या मुळे तिचे आयुष्य किती ढवळून निघेल याची तिला किंचितशी ही कल्पना नसेल), आमचे मधले काका- विलास (PWD मधून सेवा निवृत्त झाले) अन आमचे तीर्थरूप (इंग्रजी भाषा प्रेमाचे जीन्स आजोबांकडून डायरेक्ट घेणारे, ऑक्सफर्ड ची चालती फिरती डिक्शनरी, कविता करुन घरात त्याच्या चिटोऱ्या फेकून देणारे.. या शिवाय आमच्या तिर्थरूपांनी अशी ही एक ओळख आहे की ते पेशाने डॉक्टर आहेत) , आमच्या आत्या- शोभा अन प्रभा(जिला आम्ही चम्या अँटी म्हणायचो..तिचं व्यक्तिमत्व वेगळं, सर्व नाव काढतात, पप्पा सांगतात ती कोणालाच घाबरायची नाही..एकदम बिनधास्त..आजोबांची डेरिंग बहुतेक तिला जीन्स मधून मिळाली असेल..आज मायलेकी एकमेकांना भेटून, एकमेकांच्या मिठीत खूप रडल्या असतील हे नक्की!).

५ मुलांचं आयुष्य, बाकी घरच्यांची लग्न , आजोबांच्या बड्या ऑफिसातून येणाऱ्या लोकांचा पाहुणचार हे करत करत आजी त्यात इतकी गुरफटून गेली की तिच्या माहेरचं कोणी वारलं तरी ती कधी गेली नाही, जाऊ शकली नाही.. जवळ जवळ ५० वर्ष तिने माहेर पाहिलं नाही. तो विरह आमच्या तिर्थरूपांनी तोडला आणि ते आजीला रावढळ ला घेऊन गेले. आजी तिथे जाई पर्यंत बाकीसर्वांचे देहावसान झाले होते. तरी एक चमत्कार झाला. जवळ जवळ वयाच्या ८५ व्या वर्षी रावढळ ला गेली असता आजीला तिची बालमैत्रीण भेटली अन तिने आजीला ओळखले सुद्धा.
विरह सहन होत नाही माणसाला. आजीने विरह नुसता सहनच नाही केला तो पचवला सुद्धा. अन त्याचा कधी सुगावा ही कोणाला लागू दिला नाही. तिच्या विरहाचे दुःख किती खोल आहे हे गेल्या अडीच वर्षात मी रोज पाहिलंय. अप्पा, किसन, काशीनाथ या तिच्या थोरल्या भावांचीच नावे तिच्या तोंडी ऐकलीयेत मी. गेल्या जवळ जवळ ५०-६० वर्षांत जिने माहेरचं नाव सुद्धा काढलं नाही, तिथे गेली नाही.. तीच माझी जगन्माता आज एक दिवस जात नाही जेव्हा ती माहेरच्या व्यक्तींचं नाव घेत नाही. अडीच वर्षांपूर्वी जेव्हा तिची स्मृती गेली तेव्हा ती फ्लॅश बँक मध्ये गेली. जवळच्या भूतकाळातील सारे सारे विसरली..अन ५०-६० वर्षांपूर्वीची तिची नाती पुन्हा नव्याने जन्माला आली. मी नेहमी पप्पांना विचारायचो अहो हिला माहेरी कधीच कसं जावसं वाटलं नाही? त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तिनेच तिच्या नकळत दिलं..तिच्या विरहाच्या जखमा इतके वर्ष ओल्याच होत्या, स्मृती गेल्याने अन आम्हाला कोणाला ओळखू न शकल्याने त्या बाहेर आल्या.

आमचे थोरले काका पार्किन्सन डिसीज ने ग्रासलेले. जगात कोणाला होत नसतील अश्या आजारांनी त्यांना ग्रासले. पार्किन्सन ने त्यांच्या मेंदूचा ताबा जो घेतला तो शेवटपर्यंत. कोणाला होत नाही, ऐकिवात नाही असा नारू रोग सुद्धा त्यांना झालेला. हे सर्व पाहून आजोबांनी त्यांचं लग्न न करण्याचा निर्णय घेतला. आजीच्या मनावर पडलेला आणखीन एक घाला!! इथूनच आजीच्या त्यागाची, कमिटमेंट ची सुरुवात होते. आजीने ही सगळी आजारपणं हसत हसत काढली. स्वतःच्या मुलीच्या लग्नात काकांना डॉक्टरांकडे घेऊन गेलीये ती. हे सर्व होत होतं आमच्या गिरगाव च्या २२५ स्क्वेअर फुटाच्या खोलीत. १९४२ ते १९९९ !!! आजी गिरगाव जगली.

घर सांभाळता सांभाळता तिने वाचनाची आवड कधी सोडली नाही. कोण जाणे कदाचित त्यातून तिला काहीकाळ मुक्ती मिळत असेल? आजीचं वाचन इतकं होत की मुंबई मराठी ग्रंथालयाने आजीला आजीवन सभासद करून घेतले होते. ग्रंथालयातील सर्व पुस्तके वाचून झाली की हे सभासदपद मिळते!! आजोबांनी सुद्धा आजीच्या वाचनाला प्रोत्साहनच दिले. त्यांनी तर आजीला इंग्रजी भाषा सुद्धा शिकवायला सुरू केलेली. पप्पा सांगतात एकदा पाणी भरत असताना आजी अचानक पुटपुटली "Two fellows are coming". हे ऐकून मी मात्र उडालोच.

४ मुलांची लग्न झाली. सर्व आपल्या संसारात रमले. त्यांना सुद्धा मुलं झाली. आजीच मात्र आयुष्य अंगावर येणाऱ्या संकटांचे मैलाचे दगड व्हावेत असेच चालू होते. १९९५ साली आजोबा गेले. आमच्या तिर्थरूपांचा सर्वात मोठ्ठा आधार. आजी त्या दिवशी खूप शांत पणे झोपली!! आजोबा गेले अन त्याच्या काही दिवसांच्या अंतरातच आमची गिरगाव ची राहती इमारत आम्ही तिथे राहत असतानाच कोसळली!!!! इथूनच आजीच्या अन आमच्या आयुष्याची अजून एक सुरुवात झाली!!
त्या जगन्मातेस सलाम!!!🙏🙏🙏
पंकज कानडे!!
युगांत!! भाग-२ समाप्त.

Monday, October 15, 2018

युगांत!! भाग -१


इतिहासात जोडले गेले सुवर्ण पान आज.
तुझ्या आगमनाने उजळून निघाले स्वर्गस्थान आज!

कुठून सुरुवात करू? आज माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करणारी, माझी ताकद, माझे सर्वस्व, जिच्या भोवती माझे आयुष्य गुंफले गेले होते ती माझी आजी देवाघरी गेली. कायमची. सर्वांना सोडून. आज ९५ वर्षांच्या इतिहासाला पूर्वविराम मिळाला. एक तप संपलं. त्याग, कष्ट सारे सारे संपले.

इंदिरा बाबुराव कानडे! या नावानेच माझे आयुष्य विणले गेले आहे.
आजीबद्दल लिहायचं म्हणजे माझ्यासारख्या फाटक्या लेखकाला एका लेखात ते विश्व समावणं शक्य नाही. म्हणून आज भाग-१ लिहायला चालू केलाय. अजून किती होतील माहीत नाही.

देवाने खूपच कृपा केली माझ्यावर. देवरूपी आई बाबा दिले. आणि त्यांची आई म्हणजे माझी आजी. प्रेमाचा अखंड वाहणारा झरा. त्यागाची अखंड तेवत असलेली ज्योत. ज्ञानाची, कर्तृत्वाची अखंड पेटती मशाल. जगात काय आहे जे तिच्याकडे नव्हते? मराठी भाषेतील तिचे ज्ञान पाहुन कुठल्याही विद्यापीठाने तिला पी.एच. डी. सहज दिली असती. तिच्या त्यागाबद्दल मी लिहिणे म्हणजे सूर्याचं तेज किती हे काजव्याने सांगण्यासारखं असेल. ते अनुभवायला तिचा सहवासच हवा. तिच्या प्रेमाची किती कीर्ती गाऊ मी? ते मी करणं म्हणजे माझ्यासारख्या कस्पटासमान माणसाने तिचा महिमा सांगणं होईल. ते सुद्धा ज्यांनी अनुभवलं तेच जाणतात. एक संपूर्ण व्यक्तिमत्व. काय आहे आयुष्यात जे तिने पाहिलं नाही? 

आजी ने तिचा जीवनपट माझ्यासमोर जेव्हा मांडला तेंव्हा कळले अरे कोणासोबत आपण राहतोय गेली इतकी वर्षे? या बाई ला एक टक्का सुद्धा माज, गर्व कधी शिवला नाही. इतकं ज्ञान, आयुष्यात इतका पैसा पहिला. इतकी गरिबी अनुभवली तरी तिच्या प्रेमात, त्यागात, स्वभावातील ओलाव्यात कसा खंड पडला नाही? हे मानव रुपात देव वास्तव्य तर करत होते का? आजी म्हटलं की मला कोण जाणे भगवद्गीताच आठवते. तिला आयुष्यच कोडं किती सहज समजलंय. जग ताकदीने नाही प्रेमाने जिंकता येते हे तिच्याकडेच पाहुन कळले. आपले वाईट करणाऱ्या, वाईट चिंताणाऱ्या व्यक्तीबद्दल सुद्धा ती कधी वाईट बोलली नाही.
आजी जसा जसा तिचा जीवनपट मांडू लागायची तसे माझ्या डोळ्यांतून अश्रूधाराच वाहायच्या. सुरुवात केली तिने तिच्या नाशिक येथील येवला येथील तिच्या आयुष्याच्या नव्या सुरुवातीपासून. अत्यंत गरीब परिस्थितीत वाढलेल्या पण बुद्धीने कुशाग्र असलेल्या माझ्या आजोबांशी म्हणजे तेव्हा वकिलीचा अभ्यास करणाऱ्या बाबुराव शंकर भगुंडे यांच्याशी..साल होते १९३९. आजोबांनी नंतर आमचे आडनाव भगुंडे काढून कानडे असे केले.

रायगड मधली महाड जवळ रावढळ या खेड्यात वास्तव्यात असताना १६ वर्षाच्या इंदू चा विवाह माझ्या आजोबांशी झालेला. रायगड ची इंदू नाशिक ला दिली. तिला तिघे भाऊ होते. तिघांची ही ती लाडकी धाकटी बहीण. आजी सांगायची माझ्या भावांनी त्या काळात आपल्या बहिणीला इतक्या लांब लग्न लावून दिले काय वाटले असेल त्यांना? आजी म्हणायची, हे तुमच्यासारखे आजचे मोबाईल नव्हते तेव्हा. पत्र सुद्धा पाठवता येत नव्हते. आजी सांगायची तिच्या लग्नात भाऊ खूप रडले. इंदू नाशिकला येऊन संसार करू लागली.

आजीच्या आयुष्याचे एक एक पान जसे तिच्याकडून ऐकत होतो तसे आपण किती निरर्थक गोष्टींवरून आयुष्यात निराश होतो हे मनोमन जाणवले आणि अर्थातच नेहमीप्रमाणे स्वतःचीच लाज वाटली. तिचं पहिलं मूळ जन्मताच दगावलं. विहिरीला पाणी भरायला गेली असता तिने कधी बाळाला जन्म दिला तिलाच कळलं नाही. शुद्धीवर आली तेव्हा बाळ जन्माला आलेल. १६ वर्षाच्या इंदूने बाळाशी तिची जोडलेली नाळ तेव्हा दगडाने ठेचुन वेगळी केली अन बाळाला घरी आणलं. तो पर्यंत खेळ खलास झालेला. त्या दुःखाची आठवण होऊन वयाच्या ९३ व्या वर्षी ही तिच्या डोळ्यातून अश्रू वाहताना पाहिलेत मी. हे प्रेम, जिव्हाळा ना किती ही श्रीमंत झालो तरी अनुभवताना येणार नाही. देवाचे आभार त्याने या देवीच्या सानिध्यात मला ठेवले. येवल्याला असताना भयंकर गरिबीत आजोबांनी शिक्षण घेतले.आमच्या आजी ने  त्यागाची परिसीमा गाठत कोवळ्या वयात संसार करायला सुरुवात केली. आजोबा नाशिकातून वकिलाच्या परीक्षेत पहिले आले अन मुंबई ला आले. साल होते १९४२.

आजी , जिचं स्वतःच गाव मुंबई होतं, ती मुंबईला आली.
मी अवाकच झालो ऐकून. आजीचं बालपण रायगड जिल्ह्यातील रावढळ या एका अगदी खेड्यातून खेडेगावात गेले. तिचं गाव मुंबई कसं काय? आजीची आई मुंबई, भायखळा इथली. रावढळ येथे अत्यंत सुस्थितीत राहिलेली आजी माझी लहानपणी. घरी दूध, तूप भरपूर. इतकं की गरिबांना अनेकदा फुकट वाटलं आहे त्यांनी . आजीचा हा किस्सा ऐकून मला स्वतःचीच लाज वाटली. आम्ही आयुष्यात पिशवीतल्या दुधाशिवाय दुसरं दूध पाहिलं नाही. कढलेलं तूप तर स्वप्नवतच. आजी गावी राहिलेली जरी असली तरी त्यांच कुटुंब खूप पुढच्या विचारांचं होतं. आजीची लहानपणी तब्येत बरी नसे. म्हणून आम्हा लिंगायतांच्या म्हणजे कडक शाकाहार करणाऱ्यांच्या घरात आजी तब्येतीची उकडलेली अंडी सुद्धा खायची. आताच्या जगातील आपल्याला तो निर्णय तेव्हाच्या काळात किती कठीण होतं ते कळणार नाही. मी जवळजवळ ९०-१०० वर्षांपूर्वीच बोलतोय. आजीचं बालपण सुखात गेलं.

तिचा तिच्या थोरल्या बंधूंवर म्हणजेच खंडाप्पा राजमानेंवर खूप जीव. आणि खंडाप्पांचा सुद्धा इंदूवर. आजीचा इतका जीव की वयाच्या ९३ व्या वर्षी अंथरुणात खिळलेली असताना सुद्धा, स्मृती जाऊन सुद्धा तिच्या मुखी अप्पा..अप्पा हेच ऐकलंय मी. अप्पा जिथे कुठे असतील तेव्हा बहिणीच्या प्रेमाने कृत्यकृत्य झाले असतील हे नक्की. त्या जगन्मातेस कोटी कोटी प्रणाम!! 🙏🙏🙏🙏
पंकज कानडे!!
भाग -१ समाप्त!!!